मासिक पाळी, माझी आणि तिची

संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी. त्यांनी लिहिलेले हे ‘विटाळाचे अभंग’. आजच्या काळातही अंतर्मुख व्हायला लावतील असे!

देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध।।

देहींचा विटाळ देहींच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म।।

विटाळ वांचोनी उत्पत्तेचे स्थान।
कोणा देह निर्माण नाही जगी।।

म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी।
विटाळ देहांतरी वसतसे।।

देहाचा विटाळ देहीच निर्धारी।
म्हणतसे महारी चोखियाची।।

*जागतिक आरोग्य संघटनेने २८ मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन' म्हणून जाहीर केला आहे.* यानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, मासिक पाळी म्हणजे काय? आणि या काळात तीला धार्मिक कृत्यांपासून लांब ठेवणे कितपत शहाणपणाचे आहे ? हे जाणून घेऊया या शास्त्रीय मासिकातून संकलीत केलेल्या माहीतीतून...
- जेट जगदीश (^J^)

मुलगी वयात आल्यावर दर महिन्याला योनीमार्गातून अंदाजे ३ ते ५ दिवस रक्त वाहते. या शारीरिक क्रियेला ‘मासिक पाळी’ असे म्हणतात.  स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्र बीजाशी  संयोग न झाल्याने ते  निरुपयोगी बीज शरीरातून बाहेर फेकले जाते. मासिक पाळीचे  हे चक्र २८ ते ३५ दिवसांचे असते. निरोगी स्त्रीमध्ये सर्वसाधारणपणे हे चक्र वयाच्या ११/१२ व्या वर्षापासून सुरू होते ते ५0 साव्या वर्षापर्यंत नियमितपणे चालू रहते.

*विज्ञान सांगते त्याप्रमाणे मासिक पाळी सुरू होणे म्हणजे दर महिन्याला मुलीच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांचे एक अस्तर (भिंतीसारखा पापुद्रा) तयार होणे. आणि मुलीच्या स्त्रीबीज ग्रंथीतून एक परिपक्व स्त्रीबीज तयार होऊन त्यात येणे. या स्त्रीबीजाचा पुरुषाच्या शुक्राणूशी जर संयोग झाला तर त्यातून गर्भधारणा होते. म्हणजे मूल जन्माला येण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होते. त्या गर्भाला या अस्तरातील रक्तवाहिन्यांकडून रक्तपुरवठा होतो. आणि पेशींतून पौष्टिक द्रव्येही मिळतात. आणि त्यातून  गर्भाची वाढ होऊ लागते. म्हणजे आपण सर्वचजण जे जन्माला आलो आहोत ती या अस्तराची कृपा. हे अस्तर म्हणजे आपला पोषणकर्ता. आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध, अस्वच्छ व विटाळ मानायचे म्हणजे जेवणाच्या भरलेल्या ताटाला लाथ मारण्यासारखाच प्रकार झाला.*

मात्र हे स्त्रीबीज आणि पुरुषाचा शुक्राणू यांचा संगम झाला नाही तर गर्भाशयातील हे अस्तर तिथेच ठेवले जात नाही. ते बाहेर ढकलले जाते. ते तसेच राहिले तर कालांतराने अशुद्ध बनू शकते. कारण त्यात रक्तवाहिन्यांतील रक्तही असते आणि पेशींतील रंगरहित द्रवही असतो. तोच दर महिन्यात बाहेर येतो. त्यालाच आपण रक्तस्त्राव म्हणतो, मासिक पाळी म्हणतो वा दर महिन्याला होतो म्हणून ऋतूस्त्रावही म्हणतो. *यातील रक्त हे अशुद्ध मुळीच नसते, उलट ते पूर्णतया शुद्ध असते. ह्रदयातून संपूर्ण शरिरात प्राणवायूयुक्त (ऑक्सिजन असलेले) रक्त पुरविणाऱ्या रोहिणींतून आलेले हे शुद्ध रक्त असते. शिवाय पेशींतून आलेली पौष्टीक द्रव्येही असतात. ती फ्लश आउट (म्हणजेच बाहेर टाकणे) केली जातात...* पुढच्या महिन्यात परत बीजारोपण झाले तर तेवढाच पौष्टिक आहार व शुद्ध रक्त गर्भाशयातील गर्भाला मिळावा म्हणून. हा निसर्गाचा चमत्कार आहे. तो जेवढा शुद्ध आहे तेवढाच पवित्रही आहे.

पूर्वी स्त्रीची पाळी चालू झाली असेल तर तिला ‘बाहेरची आहे‘ असे संबोधले जायचे. अजूनही काही घरी हा प्रकार चालतो. सामाजिक सुधारणांमुळे हल्ली अशा स्त्रीला वेगळे बसवले जाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. ‘आज की नारी‘ मुळात घरी कमी काळ असते. घरचे व ऑफिसचेही सर्रास सर्व व्यवहार व्यवस्थितपणे तीच करते. त्यामुळे तिला बाजूला बसणे/बसवणे शक्यही नाही. पण तरीही घरातली एखादी श्रावणातील पूजा, गणपती, लग्न, मुंज यांसारख्या कार्यांच्या वेळी पाळी येऊ नये, यासाठी बऱ्याच जणींचा आटापिटा असतो. कारण ‘विटाळ‘ ही संकल्पना अजून अनेकांच्या मनात ठाण मांडून बसली आहे... मग ऑफिसमध्ये ती अगदी कितीही उच्चाधिकारी असो. काही सुशिक्षित किंवा सुधारित कुटुंबे आपल्या लेकी-सुनांना पूजा, लग्नकार्य अशा प्रसंगांत पाळी असताना सहभागी करून घेतातही. पण एकतर अशांचे प्रमाण आजही नगण्य आहे. आणि ते ही बाब जाहीर बोलूनही दाखवत नाहीत.

_मासिक पाळीचा स्राव ज्या वेळेस स्त्रीला होतो त्या वेळेस अनेकींना अशक्तपणा जाणवत असतो.ओटीपोटात दुखते.संप्रेरकांतील होणाऱ्या बदलांमुळे चिडचीड़ेपणा वाढणे, निराशेचे झटके येणे, अतिशय अस्वस्थ वाटणे असे घडणे हे स्वाभाविक असते. तेव्हा ते पुरुषांनी समजून घेणे आवश्यक आहे._ पूर्वीच्या काळी घरात, स्वयंपाकात स्त्रियांना अतिशय श्रमाचे काम करावे लागायचे. अशा वेळी त्यांना सक्तीची विश्रांती मिळावी या प्रयोजनाने त्यांना सक्तीने कोपऱ्यात बसविले जाण्याची प्रथा सुरू झाली. दुसरे कारण म्हणजे होणारा रक्तस्राव. पूर्वीच्या काळी सॅनिटरी नॅपकिन्स वगैरेंचा शोध लागलेला नसल्याने, चिंध्या-फडकी ठेवून काम भागवले जायचे. तरीही जर अतिश्रमाने स्राव जास्त झाला आणि त्याच्या काही खुणा जर घरातील जमिनीवर आढळल्या तर सणासुदीला अथवा पूजेला जमणाऱ्या गर्दीत ते पटकन कुणाच्याही नजरेत येऊ शकेल, म्हणून कदाचित या स्त्रियांना वेगळे ठेवले गेल्याची शक्यता आहे. अन्यथा जर शरीरातील या उत्सर्जन स्रावाच्यावेळी वेगळे राहायचे ठरविले तर कोणीही प्रातर्विधी व लघुशंकाही करायला नको! शेवटी हीसुद्धा उत्सर्जन द्रव्येच नाहीत काय? _या संगणक, जेट युगात अशा या निरर्थक, काहीही शास्त्रीय कारणमीमांसा नसलेल्या परंपरा पाळण्याचे कारणच काय? तरीही या बायकासुद्धा श्रावणातील साधी नेहमीची पूजा आपल्या पाळीच्या डेटस्‌ बघून ठरवतात. जसे काही पाळी चालू असताना ढासर्मिक कर्मकांडाच्या गोष्टी केल्या की, स्त्रियांना लगेच  अमंगळ होणार आणि आपल्याला पाप लागणार अशी भीती वाटते! ह्या प्रकारच्या अंधश्रद्धा आजही अगदी शिक्षित घरातही पाळल्या जातात. प्रवासाच्या दृष्टीने किंवा कामाच्या दृष्टीने विचार केला तर एक वेळ ठीक आहे. नेमक्या लांबच्या प्रवासाच्या दिवसांतच पाळीच्या डेटस्‌ येत असतील तर पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेणे एक वेळ सयुक्तिक ठरेल, कारण आपल्याकडे स्वच्छतागृहाच्या सोयी पुरेशा नसतात. परंतु उगाच ऊठसूट या अशा प्रकारच्या गोळ्या घेणे नक्कीच आरोग्याच्या दृष्टीकोनातून बरोबर नाही._

*म्हणून लक्षात ठेवा,मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील एक नैसगिक उत्सर्जनाची घटना असते. तिला अंधश्रध्देच्या विळख्यात अडकवणे म्हणजे स्त्रीला मानसिक दास्यात अडकवणे होय. तेव्हा पुरुषाचे वीर्यस्खलन जर नैसर्गिक व अपवित्र मानले जात नसेल तर स्त्रीची मासिक पाळीही तेव्हढीच पवित्र आणि नैसर्गिक मानली गेली पाहीजे. पण या काळात एकूणच स्वच्छता राखणे हेही तेवढेच महत्वाचे.*

जर पुरुषांना देखील मासिक पाळी असती तर... ???
तर सॅनिटरी पॅड्स रेशनकार्डवर मिळाले असते...

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस आहे आज.
सेनिटरी नैपकिन्स (पैड्स) हे टैक्स फ्री हवे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
या विषयांवर खुल्या चर्चा जोवर होत नाही, तोवर यावर मार्ग निघणार नाही.
आदिवासी भागात ही एक जटिल समस्या आहे. या प्रकाराबाबत तिथे खूप अज्ञान आहे.
तर शहरी सुशिक्षित भागातही या मासिक पाळीमुळे स्त्रीवर भरपूर बंधनं लादली जातात.
अजून किती दिवस परंपरेच्या नावाखाली मासिक पाळीत याला शिवू नको, पूजेला बसू नको, स्वयंपाक करू नको, आमच्यात झोपू नको इ. गोष्टींना घट्ट कवटाळून बसणार आहात?
मुलींनो आज जर तुम्ही आवाज उठवला नाही, स्वच्छतेचे चार मार्ग सांगून तळागाळात याबद्दल जागरूकता आणली नाही, तर वरून मॉडेस्ट दिसणारी तुमची पुढील पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
आणि मुलांनो, आईला बहिणीला मामीला काकूला मावशीला वहिनीला वाळीत टाकलेले कधीतरी पाहिलेय ना?
प्रेयसीची पहिले दोन दिवस होणारी मरमर अनुभवलीय ना?
आदिवासी भागात पैड्स म्हणून घरातले कापडं धुवून धुवून वापरणाऱ्या स्त्रियांबद्दल ऐकलेय ना?
मग रोज रोज त्या राजकारण्यांचे, अभिनेते व तुमच्या हिरोजचे ओझे तुमच्या खांद्यावर वाहण्यापेक्षा,
पूर्ण सृष्टी जिच्या योनीतून जन्म घेते तिचा भार कमी करणे किती सुखकारक आणि आशादायी असेल नाही?
उठवा ना आवाज,
सेनिटरी नैपकिन्स टैक्स फ्री करण्यासाठी..
उठवा आवाज आणि सांगा
मासिक पाळीचे पहिले दोन दिवस स्त्री हक्काने सुट्टी घेऊ शकते म्हणून.
नाही, कदाचित तुम्हाला या गोष्टी उघडपणे बोलणे असभ्य व अनैतिकच वाटत असेल अजूनही.
-(तेजश्री च्या फेसबुक वॉल वरून साभार)
अगदी खरंय, अपल्यासारख्या सुशिक्षित तरुण पिढीनेच पुढाकार घेऊन या तथाकथित मासिक पाळी च्या नावाखाली स्त्रियांच्या होणाऱ्या घुसमटी विरोधात आवाज उठवला पाहिजे,
तर मासिक पाळी हि लाज वाटण्यासारखी , चारचौघात न बोलण्यासारखी गोष्ट नसून ती एक नैसर्गिक शारीरविद्यानिक गोष्ट आहे, तिच्या बद्दलचा न्यूनगंड, गैरसमज, स्वच्छताबद्दल चे अज्ञान दूर करण्यासाठी आपण तरुणांनीच पुढाकार घेतला पाहिजे

मला असं वाटतंय जर आम्हां पुरुषांना देखील मासिक पाळी असती तर कदाचित यावर भरपूर चर्चा झाली असती आणि सॅनिटरी पॅड्स नक्कीच टॅक्स फ्री किंवा पूर्णपणे मोफत ही झाले असते, किंवा रेशनकार्ड वर धान्य जसे महिन्याला प्रतिमाणसी 4 किलो मिळते तसे सॅनिटरी पॅड्स देखील रेशनकार्ड वर प्रतिव्यक्ती प्रतिमहिना मोफत मिळाले असते

आपल्या स्त्रीशक्ती ने एकत्र येऊन होणाऱ्या घुसमटीविरुध्द आवाज उठवला पाहीजे, वैयक्तिक स्वच्छता हा आपला अधिकार मागून घ्यायला पाहिजे आणि खऱ्या पुरुषांनी देखील याला सपोर्ट केला पाहिजे कारण आपली आई, बहीण, प्रेयसी, किंवा बायको या त्रासातून जात असतात , त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे आणि तोच पुरुषार्थ आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्रोही तुकाराम

रक्तदाता यादी