आत्मविश्वास

आत्मविश्वास वाढवण्याचे सोपे उपाय —-------
कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचे असल्यास त्या यशाचा कारक आत्मविश्वास हाच असतो ! मग क्षेत्र कुठलेही असो, त्यात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आत्मविश्वास! याच्याच जोरावर यशाची एकेक शिडी चढता येते…आत्मविश्वास हि अशी गोष्ट आहे, जी तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारकरीत्या बदल घडवून आणते. लोकांच्या नजरेने स्वत:कडे बघण्यापेक्षा स्वत:च्या नजरेत आपण स्वत: कसे दिसतो, हे समजणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच जितका तुमचा स्वत:वर विश्वास असेल तितक्या तुम्ही आयुष्यात अधिकाधिक यशाच्या पायऱ्या चढाल. आत्मविश्वास काही बाजारात विकत मिळत नाही तर तो कमवावा लागतो. अशा अनेक गोष्टी आहेत, कि ज्यामुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता. अशाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या छोट्या टिप्स मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. यावर नक्की चिंतन आणि मनन करा.
आता ज्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडणार आहे त्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही योग्य प्रकारे विचार करून त्या अमलात आणल्या तर तुमच्या विचारसरणीत नक्कीच बदल घडून येईल आणि तुम्ही तुमच्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ करू शकाल व तुमचे इच्छित ध्येय गाठू शकाल.
१) योग्य पेहराव- यश प्राप्ती साठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची समोरच्या व्यक्तीवर पडणारी छाप, तुमचा समोरच्यावर पडणारा प्रभाव. आपण( First impression is last impression ) हे वाक्य नेहमी ऐकतो. अनेक प्रसंगी साध्या साध्या गोष्टीनेदेखील अनपेक्षित परिणाम घडून येतो. स्वच्छ कपडे घातल्याने, योग्यप्रकारे आंघोळ व नियमितपणे दाढी केल्याने किंवा लेटेस्ट स्टाईल लक्षात घेऊन त्यानुसार पेहराव करणे महत्वाचे ठरते. परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही की, जास्तीत जास्त पैसे पेहरावावर खर्च करावेत. ढीगभर स्वस्तात मिळणारे कपडे खरेदी करण्यापेक्षा, निवडक परंतु चांगल्या दर्जाचे कपडे घ्यावेत. यामुळे तुमचा वेळही वाचतो, योग्य पेहराव नि त्याला शोभून दिसतील अशा मोजक्याच अ‍ॅक्सेसरीजच्या सहाय्याने आपण स्वतला स्मार्ट बनवू शकतो. आणि ऐन मोक्याच्या क्षणी कोणता पेहराव निवडावा हे ठरवावे, यात जास्त वेळ मुळीच खर्च होत नाही. तेव्हा स्वताची योग्य नि आवश्यक ती काळजी घ्या ! तसेच रोज आरशा समोर उभे राहून आपल्या पेहरावाचे निरीक्षण करून त्यात सुधारणा करा.
२) योग्य व आकर्षक देहबोली - एखादी व्यक्ती स्वत:ला कशा रीतीनं सादर करते, यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेता येतो. एखाद्या व्यक्तीला स्वत:विषयी नेमके काय वाटते, हे त्याच्या चालण्याच्या, बोलण्याच्या शैलीवरून सहज लक्षात येते. ती व्यक्ती हळू चालते, थकून चालते, उदासपणे, उत्साहाने की हेतुपूर्वक हे त्याच्या चालीवरून ओळखता येते. जे लोक खांदे झुकवून आणि काहीशा निरुत्साहाने हालचाली करीत असतात, त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. ते जे काम करतात, त्याविषयी त्यांना उत्साह वाटत नसतो आणि त्यांच्यात आत्मसन्मानाची कमतरता असते. स्वत:ची चालण्या- वावरण्याची योग्य अशी देहबोली विकसित केल्यास एकप्रकारचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. चालताना सरळ आणि ताठपणे चाला, डोके वर असू द्या नि समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला.‘स्वताचे डोके कधी खाली झुकवू नका . ते नेहमी वर असू द्या. जगाच्या चेहऱ्याला नजर भिडवून बोला. ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास असतो, त्यांच्या चालण्यात एकप्रकारचा उत्साह असतो. त्यांना अनेक ठिकाणी जायचं असतं, कित्येक लोकांना भेटायचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामं आटपायची असतात. जलद गतीनं चालून तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता. यामुळे तुमच्याविषयी समोरच्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. तुम्हाला भेटण्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हसत मुखाने सामोरे जा त्यांच्याशी हस्तांदोलन करा. हस्तांदोलन करणे, स्मित हास्य करणे या साठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाही मग यात कंजूष पणा करू नये. तसेच रोज आरशा समोर उभे राहून योग्य व आकर्षक रीतीने बोलण्याचा सराव करा.

३) कृतज्ञता व्यक्त करा तसेच इतरांचे देखील कौतुक करा- जेव्हा तुम्ही एकाहून अधिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, आणि त्यात अपयश आले कि अमुक एक गोष्ट मिळाली नाही, म्हणून वैतागत असता. परिणामी, एक प्रकारची नकारात्मक भावना तुमच्या मनात निर्माण होत असते. तेव्हा हे जर टाळायचे असेल तर आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत, त्याबद्दल सातत्याने कृतज्ञता व्यक्त करा. त्यासाठी लोकांचं कौतुक करायला शिका. समोरच्याला धन्यवाद ! किंवा आभारी आहे असे शब्द वापरायला शिका हे शब्द बोलायला कोणतेही पैसे खर्च करावे लागत नाहीत. नेहमी आपण स्वतच्याच इच्छांचा विचार करीत असतो. तेव्हा स्वत:वरून थोडं लक्ष कमी करून इतरांच्या इच्छेचादेखील विचार करा. जर तुम्ही स्वत:चा विचार टाळून इतरांनी काय योगदान दिलं आहे, हे ध्यानात घेतल्याने सकारात्मक फरक पडतो. एखादे यश, वैशिष्टय़पूर्ण गुण, प्रेमळ नातेसंबंध यामुळे सकारात्मक वृत्ती वाढते. जेव्हा आपण स्वत:बाबत नकारात्मक विचार करतो, तेव्हा आपण इतरांमध्ये दोष शोधत राहतो. हे नकारात्मकतेचं विचारचक्र तोडणं आवश्यक असते. गॉसिप करणं सोडून द्या. भोवतालच्या व्यक्तींमधील चांगल्या गुणांकडे लक्ष द्या. त्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा व त्यांचे वाईट गुण सौम्य पद्धतीने त्यांच्या लक्षात आणून द्या. तसेच रोज आरशा समोर उभे राहून स्वताचे कौतुक करायला विसरू नका.
४) चांगली संगत ठेवा व पुढच्या रांगेत बसा- संगत हि अशी गोष्ट आहे कि जी तुमच्या जीवनावर यश किंवा अपयश मिळवून देण्यास खूप प्रभाव टाकते. तुम्ही ज्या लोकांच्या संगती मध्ये वाढता त्याचा तुमच्या यशस्वी होण्यात किंवा अपयशी होण्यात खूप मोठा वाटा असतो. तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यात यश प्राप्त करायचे असेल तर त्या क्षेत्राशी संबंधित लोकांची संगत धरा. तुम्हाला तुमचे निम्मे यश यातच मिळेल. कारण चांगल्या संगतीचा परिणाम हा नेहमी चांगलाच होतो. तसेच शाळा, ऑफिस किंवा एखाद्या महत्त्वाच्या परिषदेत बऱ्याचदा असं आढळून येतं की, समोरच्या रांगेत बसण्यापेक्षा लोक मागच्या रांगेत बसण्यास अधिक प्राधान्य देतात. कारण समोरच्या रांगेत बसल्यास आपल्याकडे साऱ्यांचं लक्ष जाईल, अशी भीती त्यांना वाटत असते. त्यामुळेच ही गोष्ट टाळण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. पण या साध्याशा गोष्टीवरूनही तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे, हे जाणवतं. तेव्हा नेहमी पुढच्या रांगेत बसण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या लोकांच्या नजरेत असण्याचा लाभही असतोच. आणि पुढच्या रांगेत बसण्या मुळे आपले लक्ष बहुतेक करून समोर चाललेल्या गोष्टींकडेच राहते. आणि हि सवय आपल्या मध्ये आत्मविश्वास वाढवते.
५) मोकळे पणाने व अभ्यास पूर्ण बोला- चर्चा किंवा बैठकांमध्ये काहीजण शांत बसणं पसंत करतात. कारण आपण काही बोललो तर ते चुकीचं ठरेल, इतरांच्या नजरेत आपण मूर्ख ठरू, अशी भीती त्यांना वाटत असते. पण ही भीती वाटते, तितकी खरी नसते. उलट आपण काही बोललो तर लोक अधिक लक्षपूर्वक तुमचं बोलणं ऐकतात. तेव्हा जेव्हा कधी चर्चेत किंवा इतर ठिकाणी बोलायची वेळ येईल, तेव्हा बोलायच्या तयारीत राहा. मात्र भाष्य करताना संबंधित विषयाची सविस्तर माहिती असू द्या. तसेच विषयाला सोडून बोलू नका. एखाद्या मिटिंग मध्ये किंवा कार्यक्रमात बोलायचे असेल तर त्याची तयारी आधीच करून ठेवा. त्या वेळी बोलण्याचे मुद्दे आधीच नोट्स मध्ये लिहा. मोजकेच बोला परंतु मुद्देसूद बोला. रोज आरशा समोर उभे राहून मुद्देसूद बोलण्याचा सराव करा.
६) हाती घेतलेले धेय्य छोट्या छोट्या तुकड्यात विभागा - कोणत्याही गोष्टीत यश प्राप्त करायचे असेल तर सर्वात प्रथम त्या गोष्टीचे धेय्य निश्चित करावे लागते. हे धेय्य छोट्या छोट्या तुकड्यात विभागून घ्या. त्यामुळे ध्येय प्राप्ती करणे सोपे जाते व इतकंच नव्हे तर यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. तसेच ते धेय्य् छोट्या तुकड्यात विभागल्याने कामाचा ताण देखील कमी होतो. या पद्धतीने काम करण्याची सवय लाऊन घ्या. या पद्धतीने काम केल्यास तुम्हाला जितके अपेक्षित आहे, त्याहून अधिकच तुमच्या पदरात पडेल. एकदा का एखाद्या गोष्टीत तुम्ही यशस्वी झालात, तर तुमचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागतो. भीतीवर मात करता येते व आपल्या कामात आपली एकाग्रता टिकून राहते.

७) स्वत:च्या ध्येय्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा- कोणतेही धेय्य पूर्ण करण्या साठी एकाग्रतेची खूप आवशक्यता असते. ‘पाण्यात पडल्यावर माणूस बरोबर पोहायला शिकतो,’ हे तुम्ही ऐकलेच असेल. जोपर्यंत एखाद्या परिस्थितीतून आपण स्वतहून जात नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न करीत नाही. म्हणून आपण जे धेय्य हाती घेतले आहे त्या धेय्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. व ते धेय्य पूर्ण करण्यासाठी झपाटल्या प्रमाणे कष्ट करा. हाती घेतलेल्या धेय्याचा सर्व बाजूने अभ्यास करा व हे धेय्य किती कालावधीत पूर्ण करायचे याचे सुद्धा नियोजन करा व त्या नुसार प्रयत्न करा. धेय्य निश्चिती मध्ये धेय्य कालावधी ठरवणे हे सुद्धा खूप महत्वाचे ठरते. कारण जेव्हा आपण धेय्या निश्चित करून त्याचा कालावधी निश्चित करतो तेव्हा आपोआपच आपण त्या धेय्याने झपाटले जातो. तसेच रोज पूर्ण केलेल्या धेय्याची नोंद आपल्या नोंद वहीत करून ठेवा त्याने तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. त्याच प्रमाणे धेय्यावर लक्ष केंद्रित करण्या साठी रोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना कमीत कमी १० मिनिटे ध्यानाचा सराव ठेवा. या मुळे तुमच्या आत्मविश्वासा मध्ये व एकाग्रता शक्ती मध्ये कमालीची वाढ होऊन तुम्ही यशाच्या अजून जवळ याल.
८) आत्मविश्वासपूर्वक तसेच सकारात्मक दृष्टीकोनातून विचार आणि कृती करा - सर्व माणसं एकसारखी असतात. प्रत्येकाला वाटणारी भीती आणि इच्छा बहुतेक सारख्याच असतात. जेव्हा तुम्ही अडचणीच्या परिस्थितीत असता, तेव्हा स्वतला आदर्श माणसाच्या जागी ठेवून विचार करा. जेव्हा सभोवतालची परिस्थिती अनुकूल असते, तेव्हा ती व्यक्ती अपेक्षेपेक्षाही चांगलं काम करते. आपली भावनिक ऊर्जा कामाच्या यशापयशाविषयी विचार करण्यात खर्ची घालण्याऐवजी आणखी चांगल्या पद्धतीने कसे काम करता येईल, याचा ती व्यक्ती विचार करते. या प्रक्रियेमुळे व्यक्तीतील आत्मविश्वासाची पातळी परिणामकारकरीत्या वाढते आणि त्यातून तुमच्यातील सर्वोत्तम तेच बाहेर येतं. तुमच्या मनातील ‘पण..’दूर करा - बऱ्याच वेळेला कामाला सुरुवात करण्याआधी ‘पण हे झालंच नाही तर..’ असं मनात येते. परिणामी, कळत-नकळतपणे आपल्याकरवी पूर्ण प्रयत्नांनिशी काम होत नाही. म्हणूनच हा ‘पण..’ दूर करायचा प्रयत्न करा. एखादा महत्त्वाचा प्रसंग मग तो भाषण वा मुलाखत असो वा आणखी काही.. डोळे मिटून या गोष्टी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात होत आहेत, अशी कल्पना केल्याने त्याबाबत सकारात्मकता वाढते. एखादी गोष्ट लांबणीवर टाकू नका - एखादी गोष्ट लांबणीवर टाकणं म्हणजे भीतीला आमंत्रण देण्यासारखं आहे. घाबरून काहीही होत नसतं. अशावेळी प्रत्यक्ष कृती करणं महत्त्वाचं असतं. जर प्रत्यक्ष कृती करण्यास वेळ घेतला तर भीतीच्या छायेतून बाहेर पडण्यासदेखील वेळ लागतो. म्हणून एखादी गोष्ट चुकेल म्हणून ती टाळणं योग्य नव्हे. त्यावर उपाय शोधा.
९) यशाची कल्पना करा व स्वताला शिस्त लाऊन घ्या - स्वताला रोज सकाळी सुर्योदया पूर्वी उठण्याची व रात्री लवकर झोपण्याची सवय लाऊन घ्या. तसेच रोज नियमित व्यायामाची सवय लाऊन घ्या. कोणतेही काम अंत:प्रेरणेनं केलं तर ते हमखास यशस्वी होतं. म्हणूनच काम करताना स्वतला शिस्त लावणं आवश्यक ठरते. तसेच आपण जे ध्येय्य ठरवले आहे ते ध्येय्य पूर्ण होई पर्यंत सतत मनात घोळवत राहा. कायम यशाची कल्पना करणे म्हणजे काय तर आपण जे कार्य हाती घेतो त्या कार्यात मी पूर्ण पणे यशस्वी होणारच याची कायम कल्पना करा. तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्याची कल्पना तुम्ही तुमच्या जवळच्या सर्व लोकांना म्हणजेच तुमच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रीणीना, आपल्या प्रियजनांना द्या. या मुळे तुमच्या धेय्याकडे सर्व जण लक्ष ठेऊ लागतात व जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा ते तुमची तुमच्या धेय्या विषयी सतत चौकशी करतात. या मुळे तुम्हाला तुमच्या धेय्याचा विसर पडत नाही व तुमचे ध्येय्य पूर्ण करण्याची एक अप्रत्यक्ष जबाबदारी तुमच्या मानस पटलावर येऊन ठेपते व त्या मुळे तुम्ही तुमचे कार्य अधिक जोमाने करू लागता. व हि क्रिया तुम्हाला तुमच्या धेय्या पर्यंत नेऊन ठेवते.

१०) योग्य वेळी योग्य गोष्ट करा - आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे ती अशी " योग्य वेळी घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो " या म्हणी प्रमाणेच योग्य वेळी योग्य गोष्ट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. नाही तर " बैल गेला नि झोपा केला " अशी परिस्थिती निर्माण होते, व आपण निराश होतो नि हाती घेतलेले कार्य मधेच सोडून देतो. हाती घेतलेले कार्य मधेच सोडणे म्हणजे लढाई मधेच हरण्या सारखे असते त्यासाठी आपल्या धेय्याने पछाडले जा, कारण धेय्याने पछाडल्या शिवाय ते धेय्य प्राप्त होत नाही. आपल्या धेय्या साठी दिवसातले १५ ते १६ तास वेळेचे नियोजन करून काम करा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला सर्वांचा आवडता क्रिकेट पटू सचिन तेंडूलकर हा देखील आपल्या आवडत्या खेळाचा रोज १५ ते १६ तास सराव करतो. त्या मुळे तो आज त्याच्या क्षेत्रात नाव कमावत आहे. आणि रोज १५ ते १६ तास काम करायचे म्हणजे साहजिकच आहे कि तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल. तसेच रोज थोड्याच परंतु नियमित व्यायामाची सवय लाऊन घ्या. तसेच आपल्या आवडत्या देवतेचे स्तोत्र रोज नियमित पणे वाचा. त्या मुळे योग्य गोष्ट योग्य वेळी करा नि उत्तम आत्मविश्वासाचा समन्वय साधून चांगले परिणाम साधा.
११) अपयश पचवण्याची क्षमता अंगी ठेवा - मनामध्ये नैराश्याला अजिबात थारा देऊ नका. अपयशाने निराश होऊ नका. आतापर्यंत तुम्ही ज्या योग्य गोष्टी केल्या आहेत, त्या नजरेसमोर आणा. पूर्वायुष्यात केलेल्या चुका आठवत बसू नका. एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आले तरी त्याबाबत जास्त विचार न करता थोडे डोके शांत ठेऊन ते अपयश कोणत्या कारणाने आले या वर चिंतन करा. अपयशाचे कारण तुम्हाला लगेच सापडेल. आणि एकदा का अपयशाचे कारण सापडले कि मग त्यावर मात करा. तुम्हाला आपोआपच यश मिळेल. टीकाकारांच्या टीकेबाबत विचार करू नका किंवा सरळ त्याकडे दुर्लक्ष करा. पण त्यांना तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका आणि अपयश हि अशी काही वाईट गोष्ट नाही कि ज्या मुळे आपण आपले धेय्य मधेच सोडून निराश झाले पाहिजे. तर अपयश हि यशाची पहिली पायरी आहे या दृष्टीकोनातून या कडे पहा. या जगात जे जे मोठे यशस्वी लोक तुम्हाला माहित आहेत त्या प्रत्येकाने सर्व प्रथम आपल्या जीवनात अपयशाची चव चाखली आहे. या विषयीची माहिती तुम्हाला माझ्या " जीवनाचे शिल्पकार " या लेखा मध्ये वाचावयास मिळेल. त्यासाठी सतत चिंतनाची सवय ठेवा सतत चांगले वाचनाची सवय ठेवा. ज्या लोकांनी आपल्या जीवनात यशाची शिखरे गाठली आहेत त्यांच्या गोष्टी आवश्य वाचा या मुळे मनातील नैराश्य दूर होण्यास मदत होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विद्रोही तुकाराम

मासिक पाळी, माझी आणि तिची

रक्तदाता यादी